शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

तगमगीचे हिशोब

*तगमगीचे हिशोब*

हल्ली खूप रडायला येतं
तू जवळ असावीस असं वाटतं
ज्योती बरोबरच वातीचं जळणं
फक्त समईलाच तर कळतं...

पण,समई असते गुलाम
त्या वेळेची
त्या हातांची
जे वात लावतात
तेल ही टाकतात
आणि पेटवतात ही

तिला उजळावयाचा असतो
देव्हार्याच्या गाभाऱ्यातील
कण नी कण
तिला पाहायचं असतं
झाडापासून विलग झालेल्या
फुलांचे निर्माल्यपण
जळून संपलेल्या उदबत्तीच्या
राखेची नक्षीदार रांगोळी

समईलाच कळतात
देव्हारातल्या गोष्टींचे
आणि
तुझ्या माझ्या
"तगमगीचे हिशोब"

म्हणूनच...
हल्ली खूप रडायला आलं की
मी समई कडे पाहून घेतो...
अंधार होण्याआधी
दोन क्षण प्रकाश होतो...

© विवेकवी
22/12/18