मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

"झुमरी"

"झुमरे ये झुमरे ,,, अगं किल्ल्या कुठाय बाजाराला जावून येतो  ?"
नानांनी रोजच्या सवयीप्रमाणे  सफ़ेद केसाचे आकड़े वळवत जोरदार आवाज दिला.
आतून ज्योती ही नेहमी च्या सुरात उत्तर देत म्हणाली ,"आणि कुठ असणार नेहमीच्याच् ठिकाणी ठेवल्यात ..आणि घरात बाकीचे आहेत की त्यांना बी कधी तरी आवाज देत जा की !!?"
"अगं ज्योते तस नाही झुमरी माझ लाड़क कोकरू हाय, तिला बघितला की दिस कसा भन्नाट जातो बघ आणि आज तर तिला बघयाला  पाव्हन येणार आहेत तालुक्याच्या गावचे . कुठ आहे ती ?!!"
ज्योती ने डोळे वटारत ," म्हणजे आम्हाला समद्याना काय अर्ध्या भाकरी वर घेतलेले हाय व्हय ?"
नाना,"तस नव्ह पाहिल लेकरू आई बापाच्या डोसक्यात फीट्ट बसलेला असतं बघ म्हणून ... तसे तुम्ही समदे माझे लाड़केच हायेसा..."
ज्योती,"हुम्म काय नगा सांगुस, माहिती आम्हाला तुमच प्रेम बीम ....ह्या घ्या किल्ल्या आन जावा बाजाराला"
"जातो माही माय पर माझ लाड़क कोकरु झुमरी कुठाय ?"
" आहो नाना आज दुपारी काय हाय माहितीये का ?
"काय हाय ?"
"आज की नैय दुपारी एक वाजता झी सिनमा वर अजय देवगन चा सिनेमा हाय ...आणि म्हणून श्यान झुमरी सकाळच्या वक्ताला म्हशी घेयुन तळ्या कड़ गेली बघा ...."
" तुझ्या हौशीच टकूर् हानला तुझ्या...
आरं त्या म्हशीच्या धारा काढल्या क नाय का नेल्या तस्याच ....आन तिला सांगितला व्हत न आज कुठ जावू नग म्हणून...
 तुम्ही समद्या पोरी एखाद्या दिवशी मला नेयुन इकताल बाजारात...!!
काय ती तुमची तऱ्हा....
काय ते तुमचे नाटक....
काय तो तुमचा अजय देवगन
(आणि हळूच वरच्या पट्टितला सुर एकदम खालच्या पट्टीत घेत,,,)
काय तुमची ती आय आन तिच्या समद्या पोरी एकाचढ़ एक नमुन्या....आणि त्यों राजकुमार टम्मन महाराज कुठ हाय ?"
"आणि कुठ असणार आई चा पदर पकडून 'ये आये खायला दे ...खायला दे...' चालु हाय त्याच मघाधरन..."
"जाय त्या टम्मन ला बाहीर बोलीव आणि झुमरी ला बोलवून आन म्हणा तिला बघायला पाहुनं येणार हायती आज ... तुमच्या त्या अजय देवगन ला सांग दुसऱ्या घरी सिनेमा दाखेव म्हणा आज ...आमच्या घरी पाहुणे येणार हायेत ते. हौशीला बी सांग आवर म्हणा पटक्यास तैयारी ला लाग कार्यक्रमाच्या... "
ज्योती उड्या मारतच आत गेली आणि हौसाबाईला आणि टम्मन महाराजाना  नानाचा निरोप दिला.
डुबक टुबुक पोटाचा नगारा हलवत टम्मन बाहेर आला आणि नाना ना म्हणाला ,"काय वो नाना ? काय काम हाय ? "
" जा तळ्यावर  आन झुमरी घरी यायला सांग नाना न बोलावल म्हणून ."
आतून आनी उर्फ़ अनीता बाहेर पळत आली आणि नाना ना म्हणाली ," नाना ह्यो कधी पोहाचायचा मीच जाते निरोप द्यायला."
टम्मन ही खुष झाला व कोणाला काही ही प्रतिसाद न देता परत थेट स्वयंपाक घराकडे निघाला. मग नाना बाजाराला आणि आनी तळ्याकडे निघाली.
तर मंडळी हे आहे आमच्या नाना ढमढेरे ह्यांच तुडुंब भरलेले कुटुंब.सरकार च्या 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' पंचवार्षिक योजनेला तिलांजली देत नानांनी जणू 'एकराला एकरं आणि लेकराला लेकरं जोड़प्रकल्प' नावाची नविनच योजना अमलात आणली. हौसाबाईची हौस होती घराला कुलदिपक हवा म्हणून झुमरी उर्फ़ वैशाली,ज्योती,अनीता,संगिता,सुनीता पाच मुलींच्या पाठीवर सहावा देखणादिवा प्रदीप उर्फ़ टम्मन ढमढेरे घराण्यात प्रज्वलित झाला.
इकडे झुमरी तळ्या काठी असलेल्या बोराच्या झाडाची बोरं खाण्यात आणि म्हशी गवत चरण्यात मग्न होते.सोबतिला पाटलाची सुलभी आन गवळ्याची राणी आज झी सिनेमावर होणाऱ्या अजय देवगन च्या सिनेमावर फूल गप्पा आणि चर्चा.मधेच सुलभी ला काय आठवल कुणास ठावुक.
सुलभी,"काय ग झूमरें चव्हानाचा बबन डिक्टो अजय देवगन सारखा दिसतो की नाही ?"
राणी तोंडातल्या बोराला टवकारत "व्हय गं डिकटो दिसतो बघ अं आपल्या झुमरी वर बी लाइ मरतो बघ !!! व्हाय की नाय ग झूमरें ?"
झुमरी तोंडात आलेली बोराची गिठोळी बाहेर फेकत ," राने तुला सांगू का मला बी तो लाइ आवडतो बघ पण त्यानं कधी अस होऊन लव्हशिप मागितलीच नाय तर आपण तरी कश्याल हुंगायच सांग न ? "
अशी ही झुमरी लहांपनापासूनच बिनधास्त ,खुशालचेंडू गांव भर भिरभिर फिरायची म्हणून तर नाना च्या मित्र सलीम चाचा ने तीच नाव झुमरी ठेवल,
" ये मस्त मौला लड़की हमेशा झूमती रहती हे झुमरी है ये झुमरी..."
 तेव्हा पासून वैशीच नाव  झुमरी पड़ल.
एव्हाना आनी तळ्यावर पोहचली आणि तिने नानानी घरी बोलावल्या चा निरोप झुमरी ला सांगितला. झुमरी लागलीच घरी पोहचली.
सगळी तैयारी झाली पाहुणे घरी आले.पहान्याचा कार्यक्रम झाला. मुलाला झुमरी आवडली आणि झुमरीला ही मुलगा आवडला.लग्नाची तारीख ठरली.
लग्न दिवस उजाडला हां हां म्हणता लग्न लागल.जेवनाच्या पंगती उठल्या झुमरी ला वाटी लावायला गावातल्या साऱ्या बायाबापड्या आल्या.झुमरी आळी पाळीने सगल्यांच्या गळ्यात पडून रडत होती ह्याला सांभाळ त्याला सांभाळ म्हणत होती.नाना ना तब्बत सांभाळा म्हणाली,हौसाई ला काळजी घी म्हणाली.टम्मन ला ज़रा कमी खा म्हणाली. ज्योतीला तिच्या चपला ,आनी ला कानातले ,सुनी ला गावून ,आणि संगी ला मेक अप च्या सामानाला हात न लावन्याची ताकीद देवून झुमरी सासरी निघाली.
धन्यवाद
विवेक शिंदे.
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा