मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

आरसा

#आरसा
आरशाचे काय हो..
त्याला थोडीच कळत
मनाचं सौन्दर्य?

त्याला त्याच्या जन्मदात्याने
नेहमी खरंच बोलायचं शिकवलंय..

त्याला नसतं देणं घेणं
तुम्ही सुंदर आहात की कुरूप

रागाने  तुम्ही त्याचे जरी
हजारो तुकडे केले तरी
तो जे खरं आहे तेच सांगतो

किती बरं झालं असतना
त्याच्या जन्मदात्याने त्याला
मन वाचायला शिकवलं असतं
जग फक्त सुंदरच दिसलं असतं

सौन्दर्याच्या मायावी बाजारात
कोणीच कुरूप दिसलं नसतं.

सौन्दर्याच्या मायावी जगात
कोणीच कुरूप दिसलं नसतं....

© विवेकवी

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

#निषेधाची_आरोळी

असं काही वाचलं, ऐकलं, बघितलं...
छिन्नविछिन्न करणारा... 
की, जागा होतो आमच्यातला "माणूस".... 
मग 'निषेधाची आरोळी' आम्ही
कधी 'ट्विटर' वर 'हॅण्डल' करतो
तर कधी फेसबुक, व्हाट्स आप वर 'फॉरवर्ड' करतो....

सत्य असत्याचा "व्हायरल इन्फेक्शन " व्हायरस
मन आणि बुद्धीला आजारी पाडतो....
'निषेधाच्या आरोळ्या' माणूस मगं
अलगद एकावर एक मांडतो.... 

परवा घडलेल्या घटनेचा निषेध
काल संपत नाही तोच
आज नवीन प्रसंग घडतो....
कालच्या निषेधाच्या 'हँगओव्हर' वर
नवीन निषेधाचा 'उतारा'
कामी पडतो....

'निषेधाची आरोळी' ही अशीच
हवेमध्ये विरून जाते.....
जुनी 'निषेधाची आरोळी' मग
" जीवाश्माचं " रूप घेते....

करणारा करून जातो...
मरणारा मरून जातो...
तुमच्या आमच्या ' निषेधाच्या आरोळीची ' 'मेणबत्ती'
'विरोधी वारा' विझवून जातो....

© विवेक शिंदे...
अहमदनगर....

मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

#शंभर_वर्ष_आयुष्य
 नुकताच जोराचा पाऊस येवून गेला होता.आकाश काहीसे स्वच्छ काहीसे ढगाळलेले....भिजुन बिथरलेल्या पक्षांना घरट्याची ओढ़ लागलेली.मावळतीच्या सोनेरी सूर्यकिरणाच्या स्पर्शाने काळसर ढगाना हल्कीशी सोनेरी,रूपेरी किनार चढलेली. पावसाच्या थेंबानी झाडांवेलींच्या पानाफुलांवर ठिपक्या ठिपकयांची सप्तरंगी रांगोळी काढलेली. बागेतल्या जुईच्या कळ्यांचा मंदधुंद सुवास आणि नुकत्याच् पडून गेलेल्या पावसाच्या गारव्याने किचन मधे स्वयंपाकाची तैयारी करणारी मंजिरी क्षणभर मोहरली. मंजिरीचं हे लोभस रूपड पाहून क्षणभर तुळशीवृंदावनातल्या तुळशीच्या मंजिर्या ही मोहरून गेल्या.
दिवानखाण्यात fm रेडियो वर शैलेन्द्रांच, लतादीदीच्या आवाजातले अजरामर गाणे चालू होते.
‘’ओ सजना,..... बरखा बहार आई....
रस की फुहार लाई, अँखियों मे प्यार लाई
ओ सजना....’’
गाणे वातावरणाशी मंजिरीला एकरूप करत होते . गाण्याच्या सुरांबरोबर आठवणी ही मंजिरीच्या मनात रुंझी घालायला लागल्या........
प्रसन्न आणि मंजिरीचा नुकतंच लग्न झाले होते. प्रसन्न नोंकरीनिम्मित्त नुकताच जिल्ह्याच्या ठिकाणी ट्रांसफर झाला होता. लग्नानंतरच्या त्या पाहिल्या पावसांत मनसोक्त भिजलेल्या आठवणी मंजिरीच्या मनाला अलगद बिलगुन गेल्या.चिमणाचिमणीचा इवलासा संसार हळूहळू बहरत होता.
 एव्हाना प्रसन्नची मिटिंग संपली असेल ह्या विचारात मंजिरी प्रसन्नला फोन लावण्यासाठी गाणे गुणगुणत फोन जवळ गेली. तोच तिच्या मोबाइलची रिंग वाजली.प्रसन्नचाच फोन होता. अगदीच लाडात येत मंजिरी फोन उचलत म्हणाली ,  " १00 वर्ष आयुष्य आहे बघ तुला !!!!! आत्ता तुलाच फोन करण्यासाठी फोन हातात घेतला आणि तुझा फोन आला बघ!!! ...किती वेळ लागेल तुला घरी यायला ? लवकर ये .....मस्त कांदा भजी बनवत आहे तुझ्या आवडीची .... ‘’
तिला मधेच थांबवत समोरून ,"हेल्लो....."
अनोळखी आवाज ऐकून मंजिरी थोड़ीशी बावरली.
 समोरून ,"मिसेस मंजिरी बोलतायेत का ?"
मंजिरी:,"हो,,, आपण ? आणि प्रसन्न च्या फोन वरुन कसे काय बोलत आहात ...? "
समोरून ,"हेल्लो हा मंजिरी मैडम बोलत आहात काय ? मी हवालदार सोनवणे बोलतोय पोलिस स्टेशन मधून ...हेल्लो..."
मंजिरी:,"हो हो मी मंजिरीच बोलतीये पण प्रसन्नचा फोन तुमच्या कड़े कसा काय ?"
समोरून हवालदार सोनवणे, " मैडम, तुमच्या आसपास कोणी आहे का? मी काय सांगतोय ते थोडं धीर धरून येका..."
मंजिरी टेंशन मधे ,"  हो बोला मी ऐकत आहे .......नक्की काय सांगायचं आहे तुम्हाला ?."
समोरून हवालदार सोनवणे, " हे पहा मैडम, थोड्या वेळापूर्वी आपल्या शहरालगतच्या हायवेवर एक भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे त्यात काही अभागी लोक वाचू शकले नाहीत आणि कांही जखमी आहेत, तर हां फोन आम्हाला ज्या व्यक्तीजवळ सापडला  आहे ती  व्यक्तीही ह्या अपघातात वाचू शकली नाहीये, ..... आणि....आणि ..त्याच्या  डेडबॉडी जवळ हा मोबाइल सापडला. त्यातल्या स्पीडडायल वरुन 'Dear manjiri' ह्या नावावरुन वाटल की हा नंबर जवळच्याच माणसाचा असावा असा अंदाज बांधून तुम्हाला फोन लावलाय  तरी तुम्ही डेडबॉडीची ओळख करायला ताबडतोब सिव्हील हॉस्पिटलला या .... ठेवतो ....,."
..........
क्षणात भयानक भीषण  शांततेने घरावर कब्जा मिळवला. मंजिरीचे अवसाणच गळून गेले.तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. लताजींच्या आवाज तिला भेसुर वाटायला लागला.ती जागेवरतीच थिजुन गेली. सुखाचा मांडलेला हा डाव आता अर्धवट राहिला होता. तिकडे अंधारानेही सूर्याला संपूर्ण गिळून टाकले होते.आसमंत पुन्हा ढगाने व्यापून गेले.सर्वत्र विजांचा कड़कडाट सुरु झाला.तिला हवालदार सोनवणेचा दुःखद बातमीचे बोल कानात गरम तेल ओतल्या सारखे भासत होते.एका क्षणात काय झाले हे? चिमणाचिमणीच्या ह्या सुखी  संसाराला कोणाची  नजर लागली असेल.काडीकाडी सजवलेल्या  ह्या घरट्यावर हे काय संकट आले की ते क्षणात जमीनदोस्त झाले. ...संपलय सगळ संपल ......कडाडणाऱ्या विजांचा आवाज तिच्या मनावर आघात करत होता.त्यात तिला  दाराची वाजणारी बेल ऐकूच आली नाही...एकदा...दोनदा..तिनदा....बऱ्याच वेळ बेल वाजत राहिली.मंजिरी अजूनही तंद्रित होती.विजेचा एकदम जोरात कड़कडात झाला आणि मंजिरीची तंद्री मोडली. विजेच्या त्या भयानक आवाजाने तिचे हातपाय थर्थरायला लागले.पुन्हा एकदा दाराची बेल वाजली. आता कोण आले असेल वाजलेल्या बेलचा तिला आधार वाटू लागला.तसच थिजलेल्या अवस्थेत मंजिरीने दार उघडले.विजांचा लखलखाट चालूच होता. विजेच्या त्या दिव्य प्रकाशात बाहेरचे दृश्य पाहुन ती जोराने किंचाळलीच . तिने समोर जे दृश्य पाहिले ते नियती ने आपल्याशी काही तरी  लावली आहे असे तिला वाटले. समोर  प्रसन्न उभा होता.त्याला आपल्या समोर जिवंत पाहुन ती मटकन खाली बसली.आपल्याला बहुतेक भास होत असावा नियती ही आपल्याबरोबर असा कुठला खेळ खेळत आहे.तो आलेला फोन खोटा होता की ती प्रसन्नला जिवंत पहात होती ते ख़ोट आहे तिला विश्वासच बसत नव्हता.ती नाही.... नाही.... म्हणत जोराजोराने रडायला लागली. क्षणभर प्रसन्नला ही समजेना की काय झाले ते.त्याने तिच्या खांद्याना आपल्या दोन्ही हाताने घट्ट धरून तिला जोरा जोराने हलवले आणि विचारले ," मंजू , अगं मंजू काय झाले ??? तू रडतीयेस् का ??? केव्हाची बेल वाजवतोय तू दार का नव्हतीस उघड़त ???? " प्रसन्नचा आवाज ऐकून मंजिरीला विश्वास बसला की आपला प्रसन्न जिवंत आहे.तिने त्याला घट्ट मीठी मारली आणि रडत रडत झाला प्रकार तिने प्रसन्नला सांगितला. प्रसन्नने मीठी आणखीनच घट्ट करत तिचे डोळे पूसत तिची समजूत काढली. "मी आलोय ना आता काळजी करू नकोस आधी शांत हो आणि बस बर इथे खाली. " म्हणत तिला सोफ्यावर बसवले.
‘’ आरे पण हे अस कस झाले तो तो फोन ...आणि तो अपघात ...?  खरचं हे खर आहे की माझ्या मनाचे भास आहेत ? ‘’
प्रसन्नने हाताची ओंजळ करून तिचा चेहरा आपल्या तळहाताच्या ओंजळीत धरून तिची समजूत काढली मग कुठे मंजिरीच्या जीवात जीव आला तशी ती प्रसन्नला घट्ट बिलगली आणि हा क्षण आता परत कधीच संपू नये अशी देवाला मनोमन प्रार्थना करू लागली.
 "थांब मी देवा पुढे दिवा लावते व साखर ठेवून आले." म्हणत मंजिरीने देवापुढे दिवा लावला,साखर ठेवली, मनोमन शाश्रू नयनांनी देवाचे आभार मानले. देवासमोर साखर ठेवून हातात साखरेची वाटी घेवून प्रसन्न ला साखर देण्यासाठी साखर प्रसन्नच्या तळहातावर टेकवली. प्रसन्नने साखर तोंडात टाकली आणि विचार करू लागला की आपला मोबाईल त्या अक्सिडेंट झालेल्या व्यक्ती कडे कसा काय गेला असेल? ह्याचा विचार प्रसन्न करत होता.
‘’आरे हो आठवल !!!!!  माझ्या मोबाइलची बैटरी डिस्चार्ज झाली होती म्हणून ऑफिस मधेच मोबाइल चार्जिंग ला लावला होता. आज कामाचा लोड जरा जास्तच होता.बाकीचे सर्व स्टाफ मेंबर पावसाचा जोर ओसरला म्हणुन लवकर घरी गेले होते मी ही लवकरात लवकर काम आटोपून घरी पोह्चुयात ह्या विचाराच्या नादात मोबाइल ऑफिस मधेच विसरलो बघ  !!!! आणि माझ्यानंतर ऑफिस मध्ये...... ????? , हो कन्फर्म सतीशच राहीला होता ...... "
मंजिरी म्हणाली , ‘’ हा सतीश कोण रे? ’’
प्रसन्ना म्हणाला , ‘’ अग, सतीश म्हणजे आमच्या ऑफिस मधला शिपाई, मला म्हणाला ही साहेब पाउस कमी झालाय  आता लवकर घरी जावा घरचे वाट पहात असतील आणि जाताना  तुमचा मोबाईल  घेयून जा नाही तर इथच विसरताल.तुमचे महत्वाचे काम तर घरीबी चालूच असतात. उगाच कामाचा खोळंबा नको तुमचाही आणि कंपनीचाही म्हणून आठवण करून देतो.आपला बर आहे आपल्याकड मोबाईल बी नाय आणि ती त्याची तुनुणूक तुनुणूक कटकट बी नाही.ध्यानात करून घेयून जावा मोबाईल..  मी आलोच बाकीच्या खिडक्या दार लावून आणि मी थोड काम शिल्लक होता तेव्हडा आटोपलं आणि घाईघाईत laptop बंद केला आणि निघालो आणि तिथेच मोबाईल विसरलो बघ. म्हणजे... माझ्या  मोबाईलच्या काळजी पोटी  सतीश मला मोबाईल द्यायला निघाला.... आणि .... रस्त्यात त्याचा अपघात झाला असावा ...
आरे.. रे..रे  हे काय झाला आपल्या एका शुल्लक चुकीमुळे आपण एखाद्याचा मृत्यूचे कारण बनलो. ह्या विचाराने त्याला तोंडातली साखर कडवट लागायला लागली.
‘’ मंजिरी आवर लवकर आपल्याला सिव्हील हॉस्पिटल ला जायला हवा जर ती डेडबॉडी सतीश ची असेल तर त्याच्या घरच्यांना कळवावे लागेल.. चल आवर निघुयात ...’’
दोघेही सिव्हील हॉस्पिटलला आले तिथला माहोल चक्रावून टाकणारा होता सर्वत्र एकच धावपळ चाललेली कुणाचा कुणालाच मेळ लागत नव्हता.सर्वदूर हॉस्पिटल मध्ये फक्त चिंताच तेव्हडी काय ती आनंदाने हसत बागडत होती. सोनावणे हवालदाराला घेयून प्रसन्न आणि मंजिरी शवघराकडे गेले. मंजिरीला बाहेरच थांबवून प्रसन्न मृतदेहाची ओळख पटवायला शवघरात गेला.सर्व मृतदेह नीट निरखून पाहिले आणि त्यात सतीश त्याला कुठेच सापडला नाही.म्हणजे सतीश अजूनही जिवंत असू शकतो  हे पाहून त्याला मनोमन आनंद झाला.बाहेर येवून सतीशची डेडबॉडी आत नाही म्हणजे सतीश जिवंत असावा हे मंजिरीला सांगून तिघेही मग जखमी पेशंटच्या वार्डकड  धावतच निघाले.वार्डमधल्या एका कॉटवर शून्यात नजर ठेवून झोपलेला सतीश प्रसन्नच्या नजरेस पडला.त्याच्या जवळ जात प्रसन्नने त्याला हाक मारली.
‘’साहेब...साहेब मला माफी करा माझ्या कडून तुमचा मोबाईल हरवला बघा अपघात झाला आणि मी बेशुद्ध झालो बघा आणि त्याच गोंधळात तुमचा मोबाईल कुठ तरी गहाळ झाला बघा  अपराधी मनाने आपल्या कडून मोबाईल कुठतरी हरवला आहे आणि माझा मन लागना बघा माफी करा मला साहेब...’’
प्रसन्नने नुसत स्मितहास्य करत सतीशला कडकडून मिठी मारली.
‘नियंती’ आणि ‘मृत्यू’ ने खेळलेल्या ह्या खांदेबदलाच्या खेळालाच  ‘’१०० वर्ष्याच आयुष्य’’ अस म्हणत तर नसतील न असा विचार मनात येवून मंजिरीच्या डोळ्यात अलगद आनंदअश्रू तरळून आले.

....the end.....
विवेक शिंदे.
अहमदनगर.9890701700
"झुमरी"

"झुमरे ये झुमरे ,,, अगं किल्ल्या कुठाय बाजाराला जावून येतो  ?"
नानांनी रोजच्या सवयीप्रमाणे  सफ़ेद केसाचे आकड़े वळवत जोरदार आवाज दिला.
आतून ज्योती ही नेहमी च्या सुरात उत्तर देत म्हणाली ,"आणि कुठ असणार नेहमीच्याच् ठिकाणी ठेवल्यात ..आणि घरात बाकीचे आहेत की त्यांना बी कधी तरी आवाज देत जा की !!?"
"अगं ज्योते तस नाही झुमरी माझ लाड़क कोकरू हाय, तिला बघितला की दिस कसा भन्नाट जातो बघ आणि आज तर तिला बघयाला  पाव्हन येणार आहेत तालुक्याच्या गावचे . कुठ आहे ती ?!!"
ज्योती ने डोळे वटारत ," म्हणजे आम्हाला समद्याना काय अर्ध्या भाकरी वर घेतलेले हाय व्हय ?"
नाना,"तस नव्ह पाहिल लेकरू आई बापाच्या डोसक्यात फीट्ट बसलेला असतं बघ म्हणून ... तसे तुम्ही समदे माझे लाड़केच हायेसा..."
ज्योती,"हुम्म काय नगा सांगुस, माहिती आम्हाला तुमच प्रेम बीम ....ह्या घ्या किल्ल्या आन जावा बाजाराला"
"जातो माही माय पर माझ लाड़क कोकरु झुमरी कुठाय ?"
" आहो नाना आज दुपारी काय हाय माहितीये का ?
"काय हाय ?"
"आज की नैय दुपारी एक वाजता झी सिनमा वर अजय देवगन चा सिनेमा हाय ...आणि म्हणून श्यान झुमरी सकाळच्या वक्ताला म्हशी घेयुन तळ्या कड़ गेली बघा ...."
" तुझ्या हौशीच टकूर् हानला तुझ्या...
आरं त्या म्हशीच्या धारा काढल्या क नाय का नेल्या तस्याच ....आन तिला सांगितला व्हत न आज कुठ जावू नग म्हणून...
 तुम्ही समद्या पोरी एखाद्या दिवशी मला नेयुन इकताल बाजारात...!!
काय ती तुमची तऱ्हा....
काय ते तुमचे नाटक....
काय तो तुमचा अजय देवगन
(आणि हळूच वरच्या पट्टितला सुर एकदम खालच्या पट्टीत घेत,,,)
काय तुमची ती आय आन तिच्या समद्या पोरी एकाचढ़ एक नमुन्या....आणि त्यों राजकुमार टम्मन महाराज कुठ हाय ?"
"आणि कुठ असणार आई चा पदर पकडून 'ये आये खायला दे ...खायला दे...' चालु हाय त्याच मघाधरन..."
"जाय त्या टम्मन ला बाहीर बोलीव आणि झुमरी ला बोलवून आन म्हणा तिला बघायला पाहुनं येणार हायती आज ... तुमच्या त्या अजय देवगन ला सांग दुसऱ्या घरी सिनेमा दाखेव म्हणा आज ...आमच्या घरी पाहुणे येणार हायेत ते. हौशीला बी सांग आवर म्हणा पटक्यास तैयारी ला लाग कार्यक्रमाच्या... "
ज्योती उड्या मारतच आत गेली आणि हौसाबाईला आणि टम्मन महाराजाना  नानाचा निरोप दिला.
डुबक टुबुक पोटाचा नगारा हलवत टम्मन बाहेर आला आणि नाना ना म्हणाला ,"काय वो नाना ? काय काम हाय ? "
" जा तळ्यावर  आन झुमरी घरी यायला सांग नाना न बोलावल म्हणून ."
आतून आनी उर्फ़ अनीता बाहेर पळत आली आणि नाना ना म्हणाली ," नाना ह्यो कधी पोहाचायचा मीच जाते निरोप द्यायला."
टम्मन ही खुष झाला व कोणाला काही ही प्रतिसाद न देता परत थेट स्वयंपाक घराकडे निघाला. मग नाना बाजाराला आणि आनी तळ्याकडे निघाली.
तर मंडळी हे आहे आमच्या नाना ढमढेरे ह्यांच तुडुंब भरलेले कुटुंब.सरकार च्या 'छोटे कुटुंब सुखी कुटुंब' पंचवार्षिक योजनेला तिलांजली देत नानांनी जणू 'एकराला एकरं आणि लेकराला लेकरं जोड़प्रकल्प' नावाची नविनच योजना अमलात आणली. हौसाबाईची हौस होती घराला कुलदिपक हवा म्हणून झुमरी उर्फ़ वैशाली,ज्योती,अनीता,संगिता,सुनीता पाच मुलींच्या पाठीवर सहावा देखणादिवा प्रदीप उर्फ़ टम्मन ढमढेरे घराण्यात प्रज्वलित झाला.
इकडे झुमरी तळ्या काठी असलेल्या बोराच्या झाडाची बोरं खाण्यात आणि म्हशी गवत चरण्यात मग्न होते.सोबतिला पाटलाची सुलभी आन गवळ्याची राणी आज झी सिनेमावर होणाऱ्या अजय देवगन च्या सिनेमावर फूल गप्पा आणि चर्चा.मधेच सुलभी ला काय आठवल कुणास ठावुक.
सुलभी,"काय ग झूमरें चव्हानाचा बबन डिक्टो अजय देवगन सारखा दिसतो की नाही ?"
राणी तोंडातल्या बोराला टवकारत "व्हय गं डिकटो दिसतो बघ अं आपल्या झुमरी वर बी लाइ मरतो बघ !!! व्हाय की नाय ग झूमरें ?"
झुमरी तोंडात आलेली बोराची गिठोळी बाहेर फेकत ," राने तुला सांगू का मला बी तो लाइ आवडतो बघ पण त्यानं कधी अस होऊन लव्हशिप मागितलीच नाय तर आपण तरी कश्याल हुंगायच सांग न ? "
अशी ही झुमरी लहांपनापासूनच बिनधास्त ,खुशालचेंडू गांव भर भिरभिर फिरायची म्हणून तर नाना च्या मित्र सलीम चाचा ने तीच नाव झुमरी ठेवल,
" ये मस्त मौला लड़की हमेशा झूमती रहती हे झुमरी है ये झुमरी..."
 तेव्हा पासून वैशीच नाव  झुमरी पड़ल.
एव्हाना आनी तळ्यावर पोहचली आणि तिने नानानी घरी बोलावल्या चा निरोप झुमरी ला सांगितला. झुमरी लागलीच घरी पोहचली.
सगळी तैयारी झाली पाहुणे घरी आले.पहान्याचा कार्यक्रम झाला. मुलाला झुमरी आवडली आणि झुमरीला ही मुलगा आवडला.लग्नाची तारीख ठरली.
लग्न दिवस उजाडला हां हां म्हणता लग्न लागल.जेवनाच्या पंगती उठल्या झुमरी ला वाटी लावायला गावातल्या साऱ्या बायाबापड्या आल्या.झुमरी आळी पाळीने सगल्यांच्या गळ्यात पडून रडत होती ह्याला सांभाळ त्याला सांभाळ म्हणत होती.नाना ना तब्बत सांभाळा म्हणाली,हौसाई ला काळजी घी म्हणाली.टम्मन ला ज़रा कमी खा म्हणाली. ज्योतीला तिच्या चपला ,आनी ला कानातले ,सुनी ला गावून ,आणि संगी ला मेक अप च्या सामानाला हात न लावन्याची ताकीद देवून झुमरी सासरी निघाली.
धन्यवाद
विवेक शिंदे.
अहमदनगर

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

'' रावण ''

माणसा तुला चांगला माहीत आहे
मी कधीच जळत नाही....
तरी दरवर्षी जाळतोस मला
विजयाचे ढोल बडवत
माझे दहन करतोस
स्वतःतला अहंकार तसाच ठेवून
माणसा तुला कधीच जाळावा वाटत नाही
स्वतः मधला तो पाशवी पशु
चिमुकल्या कळ्यांवर बलत्कार करणारा
माझ्या जळालेल्या देहातील
अनगिनत ठिनग्या तुला हेच
सांगतयेत ओरडून
मला कितीही जाळ
पण तुझ्यातल्या माणसाला
कधीही जाळु नकोस.....
~ विवेक शिंदे
 

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

" काय विशेष "

तो काल संध्याकाळी भेटला
चहा पाज म्हणाला
मी म्हणालो " काय विशेष "
फुकटचा चहा पियून
" विशेष" टेंशन चा कीड़ा
डोक्यात सोडून गेला....

घरी गाडीवर येताना तोच विषय
जेवताना डोक्यात तोच विषय
रात्री स्वप्नात तोच विषय
सकाळी त्याच विषयाच्या
हैंगओवर ने डोक जड़ पडलेला
सकाळी कामावर निघालो
कालचा तोच फुकटचा चहा पिणारा
पारावार खिदळत गप्पा मारताना दिसला
मी तोंड लपवत पुढ़ निघालो
की त्याने " कालचा विषय लक्ष्यात राहु दया"
राम राम न करता आरोळी दिली
मी "हो" "हो".....
माझ्या कड़ दुर्लक्ष करत
तो परत आपल्या दुनियेत मजेत
मी " त्या विषयाच् " ओझ घेऊन
आयुष्यभर सैरभैर..................
विवेक शिंदे....

समीर गायकवाड : वेध 'शिशिरागमना'चा ......

समीर गायकवाड : वेध 'शिशिरागमना'चा ......: जगाला भले बहारदार 'वसंत' अतिप्रिय वाटत असेल पण मला 'शिशिर' भावतो... शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जाता...