शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

अनामिक नातं

दोन अनोळखी जीव
दोन वेगवेगळ्या शहरातली
एकमेकांना
कधीही न भेटलेली

दोघांच्याही जगण्याच्या
वाटा वेगळ्या
दोघांना आयुष्यात रुतलेला
काटा ही वेगळा

दोघांनाही आवडायचा
सूर्य मावळतीचा
अन तो हळवा
केशरगंध मातीचा...

या एकाच समान धाग्यावर
ती भेटायची रोज एकमेकांना
त्या अपूर्व  क्षितिजावर
बुडत्या सूर्याला निरोप देतांना

क्षीणलेली कातरवेळ ही
तजेल सतेज होवून जायची
क्षितीजाच्या केशर कट्ट्यावर
सगळ्यांची काव्यमैफिल भरायची

सुख दुःखांची गाठोडं
घेऊन आलेली गलबतं
मग अलगद कवितेच्या
कुशीत शिरायची

सांध्यरंगाच्या ह्या
रंगपंचमीत
दोघेही मग 
चिंब चिंब भिजायची

दोघांच्या ह्या नात्याला
अनामिक नाव होतं
शब्दांच्या घरांचं बनलेलं
एक कवितेचं गाव होतं

© विवेकवी
30/11/2018

बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

तो एकटक छताकडे पाहत राहायचा

*तो एकटक छताकडे पाहत राहायचा*

क्षणभंगुर स्वप्नांचे ढग
उशाशी ठेवून
रात्रभर जड पापण्यांनी,
तो एकटक छताकडे पाहत राहायचा...
शेजारीच "जिवनमूल्य"
घोरत पडायची
"नैतिकता" ही त्याच्याकडे
पाठ फिरवून झोपायाची ..
हेच तर जोडीदार होते ना
आपल्या आयुष्याचे..
इतके ढाराढूर कसे झोपू शकतात?
ह्या विचारांती
तो एकटक छताकडे पाहत राहायचा
तसंही एकूणच खर्चिलेलं आयुष्य
पारदर्शकच जगला होता तो
एखाद्या स्थितप्रज्ञासारखा...
बुध्दितल्या आजवर कमावलेल्या
अज्ञेयवादाची कडेलोट करून
तो एकटक छताकडे पाहत राहायचा...
खरंच !
काय पाहत असेल तो?

© विवेकवी
28/11/18

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

नात्याचा पुनर्जन्म

*नात्याचा पुनर्जन्म*

तो बघ वेळ कसा निघून चाललाय
सुसाट वाऱ्यासारखा..

आपल्यापैकी एकाने तरी
माघार घ्यायला हवी..

नाही तर नियतीच्या इंजिनला लावलेली
ती शापित लोखंडी चाकं
चिरडून टाकतील
तुझ्या माझ्या अस्तित्वाच्या खुणा

क्षमवं  तुझ्या मनातल्या
विचार वादळांना
उध्वस्त होण्याआधी...
मी ही रोखून धरतो
त्या शिकारी वेळेला
प्राक्तनाच्या हातून
भक्ष्य होण्याआधी...

साफ करूयात
मनाच्या कानाकोपऱ्यात
लटकलेली अविश्वासाची किल्मीष

चल परत नव्याने
सुरुवात  करूयात..
एकमेकांच्या नजरेत
डोळस हरवूयात

अडगळीत विखुरलेल्या
मखमली शब्दांना
कवितेच्या वेलीवर
नक्षीदार चढवूयात

नात्याच्या पुनर्जन्माचा
हा नवसोहळा
एकरूप एकसंग
साजरा करूयात...

© विवेकवी
26/11/2018

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

एकटा

"तू"आणि "मी"
किंवा "आपण" सारेच
कधीच एकटे नसतो..
भोवताली नेहमीच असते गर्दी
विचारांची, स्वप्नांची,आठवणींची
कधी बुध्दितल्या रसायनांबरोबर
रंगपंचमी खेळतांना...
तर कधी मनातल्या भावनांना
अंजारत गोंजारताना...
नेहमीच आपण स्वतःला पाहतो
स्वतःबरोबर रमताना...
आपल्यातच  वाहत असतो कधी
मनविभोर पहाटवारा....
तर कधी बरसत राहतो
कातरवेळचा केशरझरा...
सुख दुःखांच्या क्षणांची
नेहमीच असते साथ...
तुला तुझं एकट्यालाच
करायची असते मात
करायची असते मात...

धन्यवाद..
*विवेकवी*
23/11/2018

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१८

मृत्युपत्र

*मृत्यपत्र*

सांग अशी माझी
काय चूक झाली?

मज प्रेमाची कहाणी
तुज अनोळखी झाली

का सोडीलेस कुरवाळणे
शब्दांनाही माझ्या

माझी कविताच
माझं "मृत्युपत्र" झाली.....

©विवेकवी शिंदे.

आरसा

#आरसा
आरशाचे काय हो..
त्याला थोडीच कळत
मनाचं सौन्दर्य?

त्याला त्याच्या जन्मदात्याने
नेहमी खरंच बोलायचं शिकवलंय..

त्याला नसतं देणं घेणं
तुम्ही सुंदर आहात की कुरूप

रागाने  तुम्ही त्याचे जरी
हजारो तुकडे केले तरी
तो जे खरं आहे तेच सांगतो

किती बरं झालं असतना
त्याच्या जन्मदात्याने त्याला
मन वाचायला शिकवलं असतं
जग फक्त सुंदरच दिसलं असतं

सौन्दर्याच्या मायावी बाजारात
कोणीच कुरूप दिसलं नसतं.

सौन्दर्याच्या मायावी जगात
कोणीच कुरूप दिसलं नसतं....

© विवेकवी

शनिवार, १४ एप्रिल, २०१८

#निषेधाची_आरोळी

असं काही वाचलं, ऐकलं, बघितलं...
छिन्नविछिन्न करणारा... 
की, जागा होतो आमच्यातला "माणूस".... 
मग 'निषेधाची आरोळी' आम्ही
कधी 'ट्विटर' वर 'हॅण्डल' करतो
तर कधी फेसबुक, व्हाट्स आप वर 'फॉरवर्ड' करतो....

सत्य असत्याचा "व्हायरल इन्फेक्शन " व्हायरस
मन आणि बुद्धीला आजारी पाडतो....
'निषेधाच्या आरोळ्या' माणूस मगं
अलगद एकावर एक मांडतो.... 

परवा घडलेल्या घटनेचा निषेध
काल संपत नाही तोच
आज नवीन प्रसंग घडतो....
कालच्या निषेधाच्या 'हँगओव्हर' वर
नवीन निषेधाचा 'उतारा'
कामी पडतो....

'निषेधाची आरोळी' ही अशीच
हवेमध्ये विरून जाते.....
जुनी 'निषेधाची आरोळी' मग
" जीवाश्माचं " रूप घेते....

करणारा करून जातो...
मरणारा मरून जातो...
तुमच्या आमच्या ' निषेधाच्या आरोळीची ' 'मेणबत्ती'
'विरोधी वारा' विझवून जातो....

© विवेक शिंदे...
अहमदनगर....